आटपाडीत खा.संजय पाटील यांच्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांचा उद्रेक निवडणुकीत काम न करण्याचा पवित्रा ; वरिष्ठांकडे दाद मागणार : पुजारी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, April 4, 2019

आटपाडीत खा.संजय पाटील यांच्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांचा उद्रेक निवडणुकीत काम न करण्याचा पवित्रा ; वरिष्ठांकडे दाद मागणार : पुजारी

आटपाडीत खा.संजय पाटील यांच्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांचा उद्रेक
निवडणुकीत काम न करण्याचा पवित्रा ; वरिष्ठांकडे दाद मागणार : पुजारी
 लक्ष्मणराव ऊर्फ एल.जी.खटके
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : खा.संजय पाटील यांना गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस प्रचंड ताकद लावून निवडून देऊनही त्यांनी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडे पाच वर्षे दुर्लक्ष केले. त्यांनी पक्षवाढीच्या  व  पक्षाच्या कोणत्याही कामाबाबत पाच वर्षात विचारात घेतले नाही, संपर्क ठेवला नाही. यामुळे तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षासह अन्य पदाधिकाऱ्यांचा खासदार पाटील यांच्या विरोधात उद्रेक झाला असून, खासदार पाटील यांचे लोकसभेच्या निवडणुकीत काम न करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
खासदार संजय पाटील यांनी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याच्या भूमिकेने दुजाभावाची वागणूक दिली आहे. जिल्ह्यातील भाजपाच्या आमदारांनाही मंत्री करतानाही त्यांनी अडथळा आणला आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्यात भाजपाचे अनेक पदे हुकली आहेत. विधानपरिषदा महामंडळाच्या निवडी याबाबत वंचित राहावे लागले आहे. त्याच्यामुळे जिल्ह्याला जिल्ह्यातील पालकमंत्री उपलब्ध झाला नाही. सदाभाऊ खोत पालकमंत्री असताना त्यांना बाजूला सारून सुभाष देशमुख यांना पालकमंत्री केले. यामध्ये खासदार संजय पाटील यांचा कुटील डाव आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला असून, जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. खासदार पाटील हे भाजपाचे नव्हते नाहीत व भविष्यातही नसतील त्यांना भारतीय जनता पार्टीने जर उमेदवारी दिली नाही तर ते कधीही काँग्रेसकडे गेले असते, असे खासदार संजय पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
आटपाडी तालुक्यातील विविध निवडणुकांमध्ये व पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांनी द्वेषाची भावना निर्माण केली होती. त्यामुळे तालुक्यातील उमेदवार पराभूत कसे होतील असा त्यांचा दावा होता, असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष व अन्य काही पदाधिकारी नाराज असून खासदार पाटील यांच्याविरोधात उद्रेकाचे लाट उसळली आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचे कोणत्याही प्रकारचे काम करायचे नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. याबाबत त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी यावेळी बोलताना म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विटा येथे झालेल्या परिवर्तन रथ यात्रेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील  आणि  विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली 2013 पासून ज्यावेळेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाला, बैठकीला, सभेला  ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस  भारतीय जनता पार्टीचा आटपाडी तालुक्याचा तालुकाध्यक्ष म्हणून त्याठिकाणी उपस्थित राहिलो. सन 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पार्टीचे खासदार निवडून आणायचे म्हणून पार्टीचा आदेश म्हणून ज्या खा. संजयकाका पाटील यांच्यासाठी पार्टीचा कार्यकर्ता, तालुकाध्यक्ष या नात्याने जीवाचं रान करून लोकसभा निवडणुकीमध्ये आटपाडी तालुक्यासह जिल्ह्यामध्ये जिथे-जिथे संपर्क आहे, त्या सर्वांशी संपर्क करून पार्टीच्या कमळ चिन्हावर म्हणजेच संजयकाका पाटलांना भरघोस मतदान करून घेतले. परंतु त्यानंतर लगेचच होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संजयकाका पाटील यांनी पक्षाची निष्ठा न ठेवता खानापूर मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत पक्षाचे उमेदवार गोपीचंद पडळकर हे निवडणूक रिंगणात उभे असताना त्यांना डावलून त्यांनी त्यावेळचे राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेसचे उमेदवार यांना मदत केली. तरीही  आम्ही या पार्टीवरची निष्ठा आणि जिल्हाध्यक्षांचा आदेश पाळून अगदी  कालपर्यंत झालेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक, तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक सर्व ठिकाणी पक्षाच्या आदेशानुसार आपापले उमेदवार तसेच सरपंच उभा करून निवडून आणलेत. ज्या-ज्या वेळेला पक्षाने आटपाडी तालुक्यामध्ये पक्षाची बांधणी करण्यासाठी वन बुथ टेन युथ, सर्व बूथप्रमुख, सर्व पार्टीच्या कमिट्यावरती, सेलवरती नेमणुका जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यांमध्ये केलेली आहे.
अगदी काल-परवापर्यंत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जिल्हा आढावा बैठकीमध्ये आटपाडी तालुका आणि त्या तालुक्यातील कार्यकर्त्यांची ठामपणे पक्षाच्या बाजूने असलेली भूमिका मांडली. परंतु त्यानंतर खा.संजय पाटील यांनाच पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर तरीही आम्ही पक्षाच्या पाठीशी उभा होतो.


पाच वर्षांमध्ये खासदारांकडून ना कोणत्या कामासाठी, ना कोणत्या पक्षाच्या मीटिंगसाठी, तालुकाध्यक्ष या नात्याने एखाद्या विषयाच्या चर्चेसाठी एकही फोन आलेला नाही. आता निवडणुकीच्या वेळी त्यानंतर प्रथमच त्यांच्या ऑफिसमधून फोन आला आहे. तरी पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींना, अगदी राज्य नेतेमंडळींना भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष या नात्याने विनंती आहे की, आजपर्यंत खासदारांना एकदाही तालुकाध्यक्ष दिसला नाही; मग आत्ताच त्यांनी तालुकाध्यक्षांना कॉल का केला? याचा जाब विचारावा का? आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत, मागासवर्गीय समाजातील आहोत म्हणून आवर्जून डावलले जात आहे, याची आम्हाला खंत आहे. त्याच्याही पुढे जाऊन संजय पाटलांचा अर्ज भरण्यासाठी जी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली, त्या बैठकीसही बोलवलं नाही. आटपाडी मध्ये जी बैठक झाली त्या बैठकीसही डावलण्यात आलं. तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना फोन केले पण कोणालाच त्यांनी निमंत्रण न दिल्यामुळे आणि मलाही न बोलवल्यामुळे, आम्हाला ज्या पक्षामध्ये मान मिळत नाही, ज्या पक्षाच्या नेतृत्वाकडून सन्मान मिळत नाही, अशा नेतृत्वाच्या पाठीमागं पक्ष कितीही चांगला असला तरी आम्ही त्या नेतृत्वाचं निवडणुकीमध्ये काम करणार नाही, असे मी घोषित करतो.  पार्टीच्या जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यालयातील सर्वांना विनंती संजयकाका पाटलांना तुम्ही जाब विचारावा की आटपाडी तालुक्याचा तालुकाध्यक्ष असूनही आवर्जून का डावलण्यात आले.
प्रभाकर पुजारी,

तालुकाध्यक्ष, भाजपा आटपाडी.

No comments:

Post a Comment

Advertise