ग्रामीण भागातील महिलांना लघुउद्योग फायदेशीर : चाँद शेख - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, March 14, 2019

ग्रामीण भागातील महिलांना लघुउद्योग फायदेशीर : चाँद शेख

माणदेश एक्सप्रेस न्यूज
वरकुटे-मलवडी/प्रतिनिधी : रोजगारनिर्मिती हा आर्थिक विकासाचा अत्यंत इष्ट आणि आवश्यक परिणाम असायला हवा. आर्थिक विकास हा देशातील सर्वसामान्य जनतेचे आर्थिक जीवन संपन्न करण्यासाठी आवश्यक असतो.
जिल्हा उद्योग केंद्रामार्फत फँशन डिझाईनींगचे प्रशिक्षण घेतलेल्या घराघरातील महिलांनी ग्रामीण भागातच बचतगटामार्फत भांडवल उभे करून लघुउद्योग उभे करावेत. शहरातील बाजारपेठ काबीज करावी. यामुळे आपल्याबरोबर इतर महिलांना रोजगार निर्मितीबरोबर प्रत्येकाच्या हाताला काम मिळून रोजगार मिळाल्याने त्यांची अर्थिक परिस्थिती उंचावेल, अशाप्रकारचे मत सातारा येथील उद्योजक चाँदभाई शेख यांनी व्यक्त केले.
वरकुटे-मलवडी येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात दिशा सामाजिक संस्था दहिवडी यांचेतर्फे जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत मागासवर्गीय महिलांना ४५ दिवसाचे फँशन डिझायनिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याच्या सांगता समारंभाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बनगरवाडीच्या सरपंच रंजना बनगर, माण तालुका मराठी पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष सिद्धार्थ सरतापे(सर),सुवर्णा साखरे,विजय साखरे, निलेश यादव, मारूती केंगार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच रंजना बनगर म्हणाल्या की, महिलांनी चुल आणि मुल यातून बाहेर पडून स्वत: मिळवलेल्या कौशल्याच्या सहाय्याने आपल्यासह कुटूंबाचा विकास करणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातीलच महिलांच्या अंगी जिद्दीने आणि कष्टाने काम करण्याची उर्मी आहे. त्यामुळे महिलांनी हिमतीने स्वतःच्या पायावर उभे राहून उद्योजक बनले पाहिजे. यावेळी प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Advertise