भारताचा ढाण्या वाघ परतला, अभिनंदन वर्धमान पाकिस्तानातून मायदेशी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, March 1, 2019

भारताचा ढाण्या वाघ परतला, अभिनंदन वर्धमान पाकिस्तानातून मायदेशी

भारताचा ढाण्या वाघ परतला
अभिनंदन वर्धमान पाकिस्तानातून मायदेशी
माणदेश एक्सप्रेस न्युज
नवी दिल्ली : वाघा बॉर्डरमार्गे अभिनंदन वर्धमान हे मायदेशी परतल्याने  वाघा बॉर्डरसह देशभरात आनंदाचं वातावरण तयार झालं आहे.  पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे अखेर काल (शुक्रवार) वाघा बॉर्डरवरून भारतात दाखल झाले आहेत. गेल्या 60 तासांपासून ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. अभिनंदन यांना मोठ्या सुरक्षेत भारतात आणण्यात आले. वाघा सीमेवर मोठी गर्दी केली होती. मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. अभिनंदन यांचे आई-वडील दुपारीच वीरपुत्राच्या स्वागतासाठी वाघा सीमेवर दाखल झाले होते. शिवाय, हवाई दलाच्या अधिकारी दाखल झाले होते. अभिनंदन यांना हवाई दलाचे अधिकारी ताफ्यामधून अमृतसरच्या हवाईतळावर घेऊन गेले. यावेळी प्रसारमाध्यमांनी मोठी गर्दी केली होती. अभिनंदन यांचे आगमन होणार असल्याने नेहमी होणारा बीटिंग द रिट्रीट हा सोहळाही रद्द करण्यात आला. तिरंगा फडकावून, नृत्य करून नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.

दरम्यान, अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी (ता. 27) पाकिस्तानच्या संसदेत केली होती. कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर त्यांना इस्लामाबादवरून लारोरला आणण्यात आले. लोहारवरून दुपारी वाघा सीमेवरून ते मायभूमीत दाखल झाले. यावेळी भारतीय अधिकारी ग्रुप कॅप्टन जेडी कुरियनही त्यांच्यासोबत होते.

शौर्याचं दुसरं नाव अभिनंदन
पाकिस्तानच्या ताब्यात असूनही अभिनंदन यांनी पाकिस्तानला कोणतीही माहिती दिली नाही. शिवाय, पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरल्यानंतर भारतीय हवाईदलाशी संबंधित गोपनीय कागदपत्रे त्यांनी अक्षरशा: खाल्ली. विंग कमांडर अभिनंदन यांनी त्यांच्याकडील अनेक दस्तऐवज तलावात टाकले. पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असूनही ते अतिशय निर्भीड होते. मी कोणतीही माहिती देणार नाही, असेही त्यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले. पॅराशूटद्वारे अभिनंदन खाली उतरल्यानंतर नागरिकांनी त्यांना मारहाण केली. पण, त्यांच्या हातात पिस्तूल असतानाही त्यांनी नागरिकांवर गोळीबार केला नाही.
अभिनंदन पाकिस्तानात कसे गेले?
पाकिस्तान हवाईदलाच्या विमानांनी बुधवारी भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. भारतीय हवाईदलानेही याला सडेतोड उत्तर दिले. भारताने पाकिस्तानचं लढाऊ विमान F16 उद्ध्वस्त केले. परंतु या कारवाईत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे MIG-21 विमान कोसळले. याच MIG-21 मधून पॅराशूटमधून उतरताना ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले, यानंतर पाकिस्तान सैन्याने त्यांना ताब्यात घेतले होते.
भारताच्या कूटनीतीचा विजय
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या स्थितीत देशाच्या कूटनीतीचा मोठा विजय झाला आहे. भारताच्या दबावासमोर पाकिस्तान झुकला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांना केवळ 24 तासांच्या आतच भारतीय वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याची घोषणा केली. पाकिस्तानने अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा केल्यानंतर भारताच्या तिन्ही सैन्य दलाने एकत्रित पत्रकार परिषद घेतली होती.

पाकचा खोडसाळपणा
भारताचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना भारताच्या हवाली करतानाही पाकिस्तानने खोडसाळपणा केला आहे. अभिनंदन यांना दुपारी चार वाजेपर्यंत भारताच्या हवाली करण्यात येईल, असं पाककडून सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात पाकने कागदपत्रांच्या पूर्ततेच्या नावाखाली अभिनंदन यांना   भारताच्या हवाली करण्यात दिरंगाई केली. पाकिस्तानने दोन वेळा अभिनंदन यांना हवाली करण्याची वेळ बदलवली. या सर्व घडामोडींवर संरक्षणमंत्री बारकाईने नजर ठेवून होते. रात्री उशिरापर्यंत पाकने ताटकळत ठेवल्याने भारतीयांचा सर्वांचा संताप झाला. अभिनंदन यांना भारताकडे सोपविण्यात आले.

असे सापडले विंग कमांडर अभिनंदन पाकच्या ताब्यात
पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बुधवारी सकाळी (27 फेब्रुवारी) हवाई हद्दीचं उल्लंघन करत भारतात प्रवेश केला होता. जम्मू काश्मिरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने घुसखोरी केली. भारतीय वायुसेनेने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानच्या विमानांना पळ काढला. मात्र या कारवाईत भारताचं एक मिग 21 विमान दुर्घटनाग्रस्त झालं.

No comments:

Post a Comment

Advertise