Type Here to Get Search Results !

वीटभट्टीमुळे डाळिंबबाग उध्वस्त : उंबरगाव (दि.) येथील प्रकार ; न्यायासाठी शेतकरी निलेश काळे यांचा आत्मदहनाचा इशारा

वीटभट्टीमुळे डाळिंबबाग उध्वस्त
उंबरगाव (दि.) येथील प्रकार ; न्यायासाठी आत्मदहनाचा इशारा
 माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/वार्ताहर : उंबरगाव (दिघंची) येथे गट नंबर 40  मध्ये असलेल्या श्रीरंग सदाशिव शिंदे यांच्या वीटभट्टीमुळे गट नंबर 39 मधील  निलेश अशोक काळे  यांच्या डाळिंबाच्या बागेला फटका बसला असून फळासह झाडे उद्ध्वस्त झाल्याची घटना घडली आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही न्याय मिळाला नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिघंची-पंढरपूर रस्त्यालगतच उंबरगाव ग्रामपंचायत हद्दीत श्रीरंग सदाशिव शिंदे यांचा गट नंबर 40 या जमिनीमध्ये वीटभट्टीचा व्यवसाय आहे. त्यांच्या या गटालगतच निलेश अशोक काळे रा.उंबरगाव या शेतकऱ्याची 300 डाळिंब झाडांची फळबाग आहे. मागील काही दिवसांपूर्वी वाऱ्याचा झोत अधिक वाढला होता. या दरम्यान विटा भाजण्यासाठी भट्टी पेटवल्यानंतर वाऱ्यामुळे त्याची झळ डाळिंब बागेतील झाडांना लागल्यामुळे झाडांची संपूर्ण पाने पूर्णपणे भाजून गेली. त्यांनी चार महिन्यापूर्वीच बाग धरली आहे. ती जोपासण्यासाठी त्यांनी 390 रुपये प्रति झाड असा खर्च केला आहे. सध्या तालुक्यामध्ये पाणीप्रश्न गंभीर असल्यामुळे, या बागेला  फळ धरल्याच्या हंगामात पाणी कमी पडू लागले. त्यांनी या परिस्थितीतही डाळिंब बागेला टॅंकरने पाणी देऊन डाळिंब बाग जोपासली होती. परंतु वाऱ्यामुळे आगीच्या पसरलेल्या धगीने फळेही करपून गेली. याबाबत त्यांनी वीटभट्टी मालक श्रीरंग सदाशिव शिंदे यांना सांगितले असता, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, उलट त्यांनीच निलेश काळे यांना उद्धट भाषेत त्यांनी तुझ्या चुकीमुळेच हे झाल्याचे सांगत दुसरी भट्टीही लावली. त्यामुळे राहिलेल्या बागेसही मोठा धोका निर्माण होऊन पुन्हा झाडांची तशीच अवस्था झाली असल्याचे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे.

त्यामुळे सदर वीटभट्टीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे सांगलीचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, दिघंची मंडळाचे मंडल अधिकारी, आटपाडीचे तहसीलदार तालुका कृषी अधिकारी त्यांच्याकडे केली आहे. 

या घटनेची त्यांनी कोतवाल व तलाठी यांच्यामार्फत समज देऊनही, वीटभट्टीचालकाने राजकीय वजन वापरून, न्याय देण्यास टाळाटाळ करत असल्याचे निलेश काळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
नीलेश काळे यांनी तहसीलदार कार्यालयात दि 8 जानेवारी 2019 रोजी वीटभट्टीच्या उष्णतेने व धुरामुळे डाळिंब बहार पिकाचे नुकसान झालेबाबत अर्ज दिला होता. 31 जानेवारीपर्यंत पिकांचे पूर्ण नुकसान, पीक बहार वाया गेला होता. परंतु दिघंची सजाचे तलाठी यांनी नुकसान होऊन 60 दिवसानंतर डाळिंबाच्या झाडांची पाहणी केली व कुठलेही नुकसान झाले नाही असे सांगितले. नुकसान भरपाई द्यावी लागेल या भीतीपोटी उशिरा चौकशी करून, चुकीची माहिती देऊन आपणावर अन्याय केला असल्याचे त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. याबाबत नुकसान भरपाई मिळवून न्याय न मिळाल्यास आपण आत्मदहन करणार असून, त्यास प्रशासन व भट्टीचालक जबाबदार असतील असे त्यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies