मुलगा-मुलगी समान संकल्पना सत्यात आणणे काळाची गरज-राणी पाटील - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 13, 2018

मुलगा-मुलगी समान संकल्पना सत्यात आणणे काळाची गरज-राणी पाटील


मुलगा-मुलगी समान संकल्पना सत्यात आणणे काळाची गरज-राणी पाटील
माणदेश एक्सप्रेस न्युज
गोंदवले/वार्ताहर : ता.११- मुलगा-मुलगी समान ही संकल्पना प्रखरपणे सत्यात आणणे ही काळाची गरज आहे असे मत जेष्ठ समाजसेविका राणी पाटील यांनी किरकसाल(ता.माण)येथे व्यक्त केले.
आदर्श गाव किरकसाल ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या विचारांचा दीपोत्सव कार्यक्रमात महिला सबलीकरण व लेक वाचवा या विषयावर त्या बोलत होत्या. डॉ.शुभांगी काटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी मंत्रालय कक्ष अधिकारी मृणालिनी पोळ, स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या गौरी कट्टे, डॉ. रेश्मा काटकर, यमुना देशमुख, रंजना महानवर, हाफीजा तांबोळी, किरकसालच्या सरपंच शिला शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
राणी पाटील म्हणाल्या, वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान हे शरीरातील दोष दूर करण्यासाठी महत्वाचे असूनही सध्या मात्र त्याचा गैरवापर होत आहे. त्यामुळेच मुलींच्या संख्येत मोठी घट झाली आहे. शिक्षणामुळे महिलांना मोठी ताकद आली असली तरी भौतिक पेक्षा गुणात्मक विकास होण्याची आवश्यकता आहे.
मृणालिनी पोळ म्हणाल्या, स्पर्धा परीक्षा ही सातत्य व मेहनतीची परीक्षा असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अधिकारी का व्हायचे हे स्पष्ट करूनच अभ्यासाला लागा. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील मार्गदर्शन करू.
गौरी कट्टे म्हणाल्या, शिक्षण ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संधी आहे. त्यामुळे अपयशाने खचून न जाता जिद्द, चिकाटी, आत्मविकास व संयम ठेऊन अभ्यास करा,यश निश्चित मिळेल. दरम्यान किरकसालमधील विविध क्षेत्रातील गुणवंत महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.अमृता काटकर हिने महिलांवर आधारित केलेल्या कवितेलाही उत्स्फूर्त दाद मिळाली. प्रियांका अवघडे यांनी प्रास्ताविक केले. अमोल काटकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Advertise