Type Here to Get Search Results !

कडेगाव येथे शेतकऱ्यांचे विजापूर-गुहागर मार्गावर रास्ता रोको आंदोलन



शेतकऱ्यांचे विजापूर-गुहागर मार्गावर रास्ता रोको आंदोलन 

माणदेश एक्सप्रेस न्युज 
कडेगाव/प्रतिनिधी : कडेगाव तलाव टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात समावेश करावा व टेंभू सिंचन योजनेच्या पाण्याने तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावा.  या विविध मागण्यासाठी कडेगाव येथील विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर संतप्त शेकडो शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकते डी.एस. देशमुख व श्रमिक मुक्तीदलाचे नेते मोहनराव यादव यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. परंतु सिंचन योजनेचे सहाय्यक अभियंता नरेंद्र घार्गे यांनी आठ दिवसात कडेगाव तलावात पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यासाठी  व अन्य मागण्या वरिष्ठापर्यंत पाठवण्यात येईल असे आश्वासन दिल्या नंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
तालुक्यात चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पाण्याभावी खरीप वाया गेला आहे. तर रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. कडेगाव शहरासह परिसरात तीव्र पाणी टंचाई भासू लागली आहे. पाणी नसल्याने हे उस पिक वाळू लागले आहेत. उस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे पाणीपट्टी म्हणून टेंभूचे अधिकारी कारखान्यामार्फत कापून घेतात मात्र पाणी पाणी देत नाहीत. म्हणून कडेगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
टेंभू सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी मुबलक प्रमाणात द्यावे व शिवाजीनगर कालव्याच्या सुर्ली कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडावे. प्रामुख्याने कडेगाव तलाव टेंभूच्या लाभक्षेत्रात घेवून तलावात योजनेचे कायमस्वरुपी पाणी सोडण्यात यावे, तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात यावा, उस बिलातून कापून घेण्यात आलेली पाणीपट्टीची पावती मिळावी. सप्टेंबर ते मे अखेर किती आवर्तने झाली ते सांगावे, शिवाजीनगरच्या मायनर नऊ व अकरा व्या किलोमीटर वितारेकेतून शेवटच्या टोकापर्यंत पूर्णक्षमतेने पाणी द्यावे तसेच शिवाजीनगर कालव्याच्या सुर्ली कालव्यातून पूर्णक्षमतेने बंदिस्त पाईपद्वारे पाणी द्यावे. कडेगाव येथील शेतकऱ्यांनी मे 2018 मध्ये टेंभू अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता  करावी अशा विविध प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान घार्गे यांनी कडेगाव तलावात पाणी सोडण्यात येईल व अन्य मागण्या पूर्ण करण्याचे व वरिष्ठापर्यंत कळवण्यात येईल असे आश्वासन दिले.
 यावेळी सामाजिक कार्यकर्ते डी.एस. देशमुख, श्रमिक मुक्ती दलाचे नेते मोहनराव यादव, शेतकरी संघटनेचे नेते युनुस पटेल, महेंद्र करांडे, संजय तडसरे, हाजी फिरोज बागवान, दीपक न्यायनीत यांची भाषणे झाली. यावेळी सुनील पवार, सुनील गाढवे, प्रकाश शिंदे, सिराज पटेल, दीपक शेंडगे, अनिल देसाई,  भरत माळी, राजाराम माळी यांच्यासह मोठ्या संखेने शेतकरी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies