ग्रामविकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया-दळवी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, November 10, 2018

ग्रामविकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया-दळवी

ग्रामविकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया-दळवी
माणदेश एक्सप्रेस न्युज 
गोंदवले/वार्ताहर : ग्रामविकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून ती कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही असे मत माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी किरकसाल (ता.माण) येथे व्यक्त केले.
आदर्श गाव किरकसाल येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विचारांचा दीपोत्सव व सत्कार कार्यक्रमाची सोमवारी रात्री सुरुवात झाली. डॉ.बी.जे. काटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, प्रांताधिकारी दादासो कांबळे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रदीप पोळ, विनोद मोहिते, आप्पासाहेब देशमुख, उपसरपंच सुखदेव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
सातत्यपूर्ण व परिपूर्ण ग्रामविकास या विषयावर बोलताना श्री दळवी म्हणाले, महात्मा गांधीनी दिलेल्या 
खेड्याकडे चला या नाऱ्याचा प्रत्यक्षात अवलंब होणे ग्रामविकासासाठी खूप महत्वाचे आहे. ग्रामविकास ही संथ गतीने चालणारी प्रक्रिया असून त्यासाठी समविचारी लोकांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. म्हणूनच लोकांच्या विचारांची वारंवार दिवाळी व्हायला हवी. भौतिक, शेती व मानवी विकासावर भर दिल्यास ग्रामविकासाला चालना मिळू शकेल.
 डॉ. सचिन ओंबासे म्हणाले,ग्रामीण भागातूनच शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत पोहचल्याने ग्रामीण अडचणींची जाण आहे. ग्रामविकासातील चांगला अभ्यास झाल्यानेच गडचिरोली सारख्या मागासलेल्या भागात काम करण्याच्या मिळालेल्या संधीचे सोने करू. तरुणांनी स्पर्धा परिक्षेतूनही ग्रामविकासाबाबत अध्ययन करावे जेणेकरून प्रत्यक्षात काम करताना अडचणींवर मात करता येईल. यावेळी प्रांताधिकारी दादासो कांबळे, डॉ. प्रदीप पोळ यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल काटकर यांनी केले.

No comments:

Post a Comment

Advertise