Type Here to Get Search Results !

स्व. आर. आर. पाटील स्मारकाचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते आज भूमिपूजन


स्व. आर. आर. पाटील स्मारकाचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते आज भूमिपूजन
माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगल, दि. 15: माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या सांगलीत होत असलेल्या भव्य स्मारक आणि सभागृह उभारणी कामाचे भूमिपूजन वित्त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक 16 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. महात्मा गांधी वसतिगृह आवार, सांगली मिरज रस्ता, हॉटेल सदानंद जवळ, सांगली येथे हा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. 
सन 2016-17 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या स्मारकाचे भूमिपूजन होत आहे. कार्यक्रमाच्या सविस्तर नियोजनाबाबत जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा घेण्यात आला. 
यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, उपजिल्हाधिकारी विजया यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एस. जाधव, सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आणि अशोक पाटील, वास्तुविशारद प्रमोद चौगुले, अविनाश पाटील, हणमंतराव देसाई, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, स्मारकाच्या कामासाठी 9 कोटी 71 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 20 गुंठे जागेवर हे स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकांतर्गत तळमजल्यावर 15 हजार 602 चौरस फूट, पहिल्या मजल्यावर 9 हजार 522 चौरस फूट असे एकूण 25 हजार 124 चौरस फूट बांधकाम करण्यात येणार आहे. स्मारकाच्या पूर्व प्रवेशद्वारावर अर्धपुतळा व डिजीटल वॉल असणार आहे. तळमजल्यावर 350 आणि पहिल्या मजल्यावर 150 खुर्च्या अशी आसन व्यवस्थाही असणार आहे. तसेच स्मारकात कलादालन, संग्रहालय, स्वच्छतागृह असणार आहे. प्रकल्पाचे आराखडे/नकाशे समितीने निश्चित केले असून, ते वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी तयार केले आहेत. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली पूर्ण करण्यात येत आहे. भूमिपूजन कार्यक्रमासाठी वाहतूक व्यवस्था व पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिल्या.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies