Type Here to Get Search Results !

म्हसवडमध्ये श्री सिद्धनाथांचे अतिकडक असे "उभ्या नवरात्राचे व्रत" सुरु


म्हसवडमध्ये श्री सिद्धनाथांचे अतिकडक असे "उभ्या नवरात्राचे व्रत" सुरु
माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/अहमद मुल्ला : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या, लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवड गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या संपूर्ण एक महिना चालणाऱ्या शाही विवाह सोहळ्याची धामधूम सध्या सुरु असून दिवाळी पाडवा ते तुलसी विवाह या12 दिवसाच्या दरम्यान पारंपारिक पद्धतीने व पूर्वापार चालत आलेले "उभ्या नवरात्रा"चे अतिशय कडक व्रत सध्या सिद्धनाथ मंदिरात सुरु झाले आहे.
म्हसवड येथील माणगंगेच्या तिरावर दहाव्या शतकातील अत्यंत प्राचिन असे हेमाडपंथी मंदीर उभे आहे. तेव्हापासून आज अखेर या मंदिरात परंपरागत चालत आलेल्या अनेक धार्मिक उपासना व अत्यंत कडक अशा व्रतांची अखंड आणि अव्याहत प्रथा अत्यंत मनोभावे सुरु असून "उभे नवरात्र" ही अति कडक आणि कठीण अशी उपासना आहे.
अनेक राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अराध्य दैवत असलेल्या येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीदेवतांचा पूर्वापार चालत आलेल्या रुढी-परंपरेनुसार हळदी-विवाह-आणि वरात या मंगल विवाहाच्या पायऱ्या आहेत. त्यानुसारच श्रींचा तब्बल एक महिना चालणारा विवाह सोहळा अनेक धार्मिक कार्यक्रमांसह साजरा केला जातो. 
या एक महिन्याच्या विवाहसोहळ्यातील सर्वात महत्वाचे व मुख्य असे हे 12 दिवस समजले जातात. कार्तिक शु.प्रतिपदा (दीपावली पाडवा) ते कार्तिक शु. प्रतिपदा (तुलसी विवाह) दरम्यान दिवाळी पाडव्यादिवशी पहाटे साडेपाच वाजता मंदिरातील मुख्य पुजारी-सालकरी यांच्या हस्ते घटस्थापना केली जाते. या घटस्थापनेच्या दिवसापासून श्रींचे 12 दिवसांचे नवरात्राचे उपवास सुरु होतात. 12 दिवसानंतर तुलसी विवाहादिवशी पहाटे साडेपाच वाजता हे घट उठविले जातात. त्यावेळी 12 दिवसाच्या नवरात्राची समाप्ती होते. म्हणजेच उपवाह सोडले जातात.
हे 12 दिवसाचे नवरात्रीचे उपवास करणाऱ्यांना  या12 दिवसात दररोज पहाटे चार वाजता कार्तिकस्नान करुन नगरप्रदक्षिणा घालावी लागते. या नगरप्रदक्षिणेची सुरुवात श्रींच्या मंदिरापासून होते. श्री सिद्धनाथ मंदिरापासून महादेव मंदीर, (कोट), माणगंगा नदीपात्रातून, बाजारपटांगण मार्गे विठ्ठल मंदीर, जोतिबा मंदीर, बसस्थानकासमोरुन खंडोबा मंदीर, सिद्धनाथ हायस्कूलमार्गे श्री संत गाडगेबाबा समाधीमंदीर, तुळजाभवानी मंदीर, वडजाई ओढामार्गे लक्ष्मी, मरीआई मंदीर, रथग्रहमार्गे, महादेव मंदीर (कोट), मारुती-शनि मंदीर, श्रीनाथ मठातून पुन्हा श्री सिद्धनाथ मंदीर अशा मार्गे दररोज श्रींच्या नावाचा जप करीत, श्रींचा महिमा सांगणारी गीते गात, नगरप्रदक्षिणा घालावी लागते. या12 दिवसामध्ये जे रविवार येतात त्या रविवारी हे नवरात्र करणारांना गावापासून सुमारे तीन कि.मी.अंतरावर असणाऱ्या राजाच्या बागेतील म्हातारदेव मंदिरात व तिथून परत येताना वडजाई मंदीर या ठिकाणी प्रदक्षिणेसाठी जावे लागते.
उभे नवरात्र करणारांमध्ये केवळ पुरुषांचाच सहभाग असतो. अद्यापपर्यंत कोणत्याही महिलेने उभे नवरात्र केलेले नाही.
उभे नवरात्र करणारांना धोतर नेसून, खांद्यावर उपरणे घेऊन, हातात तांब्याच्या कलशात शुद्ध उदकघेऊन, पायात वाहाणा न घालता ही नगरप्रदक्षिणा 12 दिवस घालावी लागते. व 12 दिवस तोच पेहराव ठेवावा लागतो. या 12 दिवसात पायात चप्पल घालावयाची नसते, गावाची वेस ओलांडून परगावी जायचे नसते, नगरप्रदक्षिणेमध्ये खंड पडू द्यायचा नसतो, अहोरात्र 12 दिवस उभे रहावे लागते. रात्री झोपताना टेबलवर पालथे झोपले तरी निदान एक पाय तरी जमिनीवर ठेवावा लागतो. झोपेमध्ये जर दोन्ही पायवर घेतले गेले तर त्याचे उभे नवरात्र मोडले, असे समजले जाते. या 12  दिवसात जमिनीवर मांडी घालून बसावयाचे नसते. दिवाळी पाडव्यापासून हे नवरात्र सुरु होत असले तरी पाडव्यादिवशी पहाटे जेव्हा जाग येईल तेव्हापासूनच उभे नवरात्र करणारांना उभे रहावे लागते व पूर्ण बारा दिवस श्रींचा जप करीत, शुद्ध मनाने, आचरणाने, पावित्र्य राखून, उभे राहूनच श्रींची उपासना करावयाची असते. 
बुधवार दि.1 नोव्हेंबर (तुलसी विवाह) रोजी पहाटे साडेपाच वाजता हे 12 दिवसाचे घट उठणार असून श्रींचे नवरात्राचे उपवास सुटणार आहेत. त्याच दिवशी रात्री 12 वाजता श्रींचा शाही मंगल विवाह सोहळा पारंपारिक व धार्मिक विधीपूर्वक, मोठ्या थाटाने संपन्न होणार आहे. 
12 दिवसांच्या या अतिशय कडक व कठीण अशा उभ्या नवरात्राची ही प्रथा पूर्वापार, पारंपारिक पद्धतीने आज अखेर तितक्याच श्रद्धेने, भावनेने व मनापासून येथील पुजारी मंडळी,व भाविकांनी अतिशय पावित्र्य राखून अखंडीतपणे व अव्याहत सांभाळलेली असून दिवसेदिवस उभे नवरात्र करणारांची सख्या वाढत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies