शहीद जवान दिनकर नाळे यांचे बलिदान खूप मोठं - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 13, 2018

शहीद जवान दिनकर नाळे यांचे बलिदान खूप मोठं


शहीद जवान दिनकर नाळे यांचे बलिदान खूप मोठं
माणदेश एक्सप्रेस न्युज 
गोंदवले/वार्ताहर- दि 12: सीमेवर देश रक्षणासाठी शत्रू बरोबर लढताना धारातीर्थी पडलेले दहिवडी येतील शहीद जवान दिनकर नाळे यांचं बलिदान खूप मोठं असून ते कायम स्मरणात राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी त्यांच्या नवव्या पुण्यस्मरण कार्यक्रम प्रसंगी केले. दहिवडी येथील शहीद जवान दिनकर नाळे यांचा नववा पुण्यस्मरण सोहळा नुकताच भवानवाडी येथे पार पडला. यावेळी सजवलेल्या व्यासपीठावर त्यांची प्रतिमा मांडण्यात आली होती. या प्रसंगी माण तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे, सैनिक बँकेचे कॅप्टन उदाजीराव निकम, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख,  सुरेखाताई पखाले, माळी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री राऊत, माण खटाव चे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, दहिवडी नगराध्यक्ष सौ साधना गुंडगे, माण तालुक्यातील वीरमाता, वीरपत्नी यावेळी उपस्थित होत्या. यावेळी नातेपुते येतील कीर्तनकार ह.भ.प. श्री सागर बोराटे यांची कीर्तन सेवा ठेवण्यात आली होती. ठीक बारा वाजता शहीद जवान दिनकर नाळे यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी आयुक्त प्रभाकर देशमुख म्हणाले, दिनकर नाळे यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता शत्रूला टक्कर देऊन त्यांचा हल्ला परतवून लावला यात त्यांना वीरत्व प्राप्त झालं त्यांचे हे कार्य अतुलनीय आहे. त्यांचं बलिदान आम्ही कधी विसरू शकत नाही. आता पर्यत माण तालुक्यातील अनेक जवानांनी सियाचीन,उरी, कारगील या ठिकाणी झालेल्या युद्धात सहभाग घेऊन शत्रूंचे भ्याड हल्ले परतवून लावत भारत मातेचे रक्षण केले आहे. देशाच्या सीमेवर जवान आहोरात्र डोळ्यात तेल घालून पहारा देत देशवासीयांची सेवा करत आहेत. जवानांच्यामुळेच आपण बिनधास्त आहोत. धन्य ती माता ज्या मातेने अशा वीर पुत्राला जन्म दिला आहे. 
यानंतर आमदार जयकुमार गोरे, उदाजीराव निकम, व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी वीरमाता, वीरपत्नी यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि सूत्रसंचलन राजेंद्र जगदाळे यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार शहीद नाळे यांचे बंधु यांनी मानले. दरम्यान शहीद दिनकर नाळे यांचं स्मारक बांधण्यात यावं अशी कुटुंबातील लोकांनी कॅप्टन उदाजीराव निकम यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार येत्या दोन महिन्यात ते काम पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise