Type Here to Get Search Results !

संगणक परिचालकांचा २७ नोव्हेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर मोर्चा


संगणक परिचालकांचा २७ नोव्हेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर मोर्चा 
महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून कायमस्वरूपी नियुक्ती देण्याची एकच मागणी
माळशिरसचे आ. हनुमंतराव डोळस व आ. रामहारी रुपनवर यांना दिले निवेदन माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे:   राज्यातील हजारो संगणक परिचालकांचा दि. २७ नोव्हेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर मोर्चा धडकणार आहे.  मागील ७ वर्षा पासून संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात काम करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणार्या  राज्यातील हजारो संगणक परिचालकाना आज पर्यंत केलेल्या सेवेनुसार महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून कायम स्वरूपी नियुक्ती मिळावी या एकाच मागणी साठी मुंबई येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनावर सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील सुमारे २५ हजार संगणक परिचालकासह २७ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा संगणक परिचालक संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष जलाल शिकलगार, संपर्कप्रमुख सोमनाथ नवगिरे यांनी दिली. 
माळशिरस तालुका अध्यक्ष नितीन मगर, सचिव अमोल होनप, जिल्हा उपाध्यक्ष महेश सुरवसे, दिपक बावचे, ज्ञानदेव खांडे, हनुमंत नरुटे, विजय काळे, किशोर खटके, अशोक देवकुळे, दादा बोडरे, योगेश तुपे, बापू बोडरे सह सर्व संगणक परिचालक बंधू उपस्थित होते.
याबाबत सविस्तर वृत्त की, मागील एप्रिल २०११ पासून संग्राम प्रकल्प व सध्याचा आपले सरकार सेवा केंद्र हा प्रकल्प असे ७ वर्ष डिजिटल महाराष्ट्राचे काम प्रामाणिक केल्यामुळे महाराष्ट्र शासनाला सलग ३ वेळा केंद्र शासनाचा ई –पंचायत मध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. तर मागील वर्षी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. राज्यातील २७८६४ ग्रामपंचायती, ३५१ पंचायत समिती व ३४ जिल्हा परिषदेचे सर्व प्रकारचे ऑनलाईन तसेच ऑफलाइन काम संगणक परिचालक करत आहेत. त्या संगणक परिचालकाना शासनाकडून हक्काचे मानधन १-१ वर्ष ते १.५ वर्ष मिळत नाही. त्यामुळे संगणक परिचालकावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच बोगस कंपन्या मार्फत या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे.
कोट्यवधी रुपये हडप करणार्याा कंपन्याना मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री यांचे अभय का?
आपले सरकार सेवा केंद्र हा प्रकल्प मुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या माहिती तंत्रज्ञान विभाग व ना. पंकजा मुंडे यांच्या कडील ग्रामविकास विभाग यांच्या माध्यमातून चालवण्यात येतो. या प्रकल्पाचे काम करण्यासाठी मागील संग्राम प्रकल्पात कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार केलेल्या कंपनीच्या व्यक्तींनाच आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाचे काम का देण्यात आले? संगणक परिचालकांचे मानधन हडप करणे, स्टेशनरी न पुरवठा करणे, प्रशिक्षण न देता,सॉफ्टवेअर बोगस देऊन १४ व्या वित्त आयोगातील जनतेच्या विकासासाठीचा कोट्यवधी रूपयांचा निधी हडप करण्यात येत असल्याची तक्रार शासनाकडे करून सुद्धा सी.एस.सी. एस.पी.व्ही व तिच्या उपकंपन्यांना शासनाकडून का अभय देण्यात येत आहे असा प्रश्न राज्यातील संगणक परिचालकांना पडला आहे.
संगणक परिचालका मार्फत होत असलेली कामे
संगणक परिचालक हे ग्रामपंचायत स्तरावरील सर्व २९ प्रकारचे ऑनलाईन दाखले देणे,१ ते ३३ नमुने ऑनलाईन करणे, शेतकरी कर्जमाफी योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, अस्मिता योजना, राज्यातील घरकुल योजनेचा सर्व्हे करणे यासह गावातील ग्रामसभा, मासिक सभा ऑनलाईन करणे, रहिवाशी, बांधकाम परवाना, नाहरकत प्रमाणपत्र, नमूना न ८, इ. कामे ग्रामपंचायतमध्ये सकाळी १० पासून संध्याकाळी ६.००  वा. पर्यंत कार्यालयात बसून देतात. या बदल्यात संगणक परिचालकांना ६ हजार रुपये असे तुटपुंजे मानधन निश्चित केलेले असताना एक वर्ष ते दीड वर्ष हक्काचे मानधन मिळत नाही, हेच का आपले सरकार ? अशी म्हणण्याची  वेळ संगणक परिचालकावर आलेली आहे.
मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री यांना आश्वासनाचा विसर पडल्यामुळेच आंदोलन!
मागील ४ वर्षापासून राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी अनेक वेळा झालेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या बैठकीत व आंदोलन स्थळावर येऊन आश्वासने दिली. पण त्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे मुंबई येथे होणार्याे हिवाळी अधिवेशनावर २७ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असून जो पर्यंत शासन सर्व संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती देण्याचा निर्णय घेत नाही तो पर्यंत संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत असा निर्धार सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व संगणक परीचालकांनी तालुक्याचे आमदार हनुमंतराव डोळस यांच्या सह विधान परिषेदेचे आमदार अॅड. रामहारी रुपनवर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे  केला आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies