अमेरिका दौऱ्यातून महिलांना झाली जागतिक बाजारपेठेची ओळख- पंकजा मुंडे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 7, 2018

अमेरिका दौऱ्यातून महिलांना झाली जागतिक बाजारपेठेची ओळख- पंकजा मुंडे


अमेरिका दौऱ्यातून महिलांना झाली जागतिक बाजारपेठेची ओळख- पंकजा मुंडे
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई: अमेरिकेतील बोस्टन येथील एमआयटी विद्यापीठात आयोजित तिसऱ्या इंडिया ग्लोबल समीटमध्ये राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमवेत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बचतगटांच्या महिलांनी आज सहभाग घेतला. या महिलांनी बचतगटांच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन करतानाच महाराष्ट्रातील ग्रामीण महिला लघुउद्योगांच्या क्षमतांचेही यावेळी सादरीकरण केले.
महिलांद्वारे उत्पादित वारली उत्पादने, हस्तकला उत्पादने, महाराष्ट्राची वैशिष्ट्ये असलेली वस्त्र उत्पादने, हातमागाची उत्पादने पाहून देश-विदेशातील पाहुणे भारावून गेले. अमेरिकेसह इंग्लड, चीन, कॅनडा, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती या देशांच्या प्रतिनिधींनी या समीटमध्ये सहभाग घेतला होता. बचतगट चळवळीमधून ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला महाराष्ट्रात मिळत असलेल्या प्रोत्साहनाबद्दल यावेळी उपस्थित मान्यवरांनी कौतूक केले.
महाराष्ट्रातील बचतगटाची चळवळ ही आता फक्त बचतीपुरती मर्यादीत राहिली नसून त्यातून महिला लघुउद्योजक मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. त्यांना जागतिक उद्योजकता, व्यवहार, बाजारपेठ यांची ओळख करुन देण्यासाठीच या अमेरिका दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. 
महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, उपक्रमांची माहिती श्रीमती मुंडे यांनी दिली. त्या म्हणाल्या की, ग्रामीण भागातील ज्या महिलांनी आजवर गावाच्या सीमा ओलांडल्या नाहीत, त्या महिला मागील आठवड्यापासून अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरात आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग आणि विक्री करीत आहेत. येथील खाद्यसंस्कृती आणि राहणीमानाचा अभ्यास करीत आहेत, जेणेकरून आपली उत्पादने येथील लोकांना अनुकूल बनविता येतील. ज्या महिला निरक्षर किंवा अत्यल्प शिक्षीत आहेत त्या देखील सुलभ इंग्रजी शब्दांचा वापर करीत आहेत. रुपया आणि डॉलरमध्ये व्यवहार करत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा दौरा निश्चितच फलदायी ठरला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा नारा दिला. आम्ही त्याला अजून पुढे नेत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटीको आगे बढाओ’ यासाठी नवनवीन योजना आखल्या व त्यांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली. आज राज्यातील तीन लाख बचतगटांतील 35 लाख महिलांशी महाराष्ट्र सरकार जोडले गेले आहे. आम्ही राज्यातील 50 हजार कृतिशील लोकांबरोबर काम करीत आहोत, अशी माहितीही मुंडे यांनी यावेळी दिली.
अभिनेते अनुपम खेर यांना महिलांच्या हस्ते फेलोशिप प्रदान
यावेळी ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांना इंडिया ग्लोबल समीटच्यावतीने फेलोशिप देण्यात आली. बचतगटांच्या महिलांच्या हातून फेलोशिप स्वीकारताना त्यांनी आनंद व्यक्त केला. याशिवाय त्यांनी बचतगटांच्या प्रदर्शनीला भेट देऊन त्यांच्या उत्पादनाचे कौतूक केले. त्यांनी बंजारा कलाकुसरीच्या वस्तू, तांब्याच्या वस्तू व ज्वेलरी खरेदी करून त्यांना प्रोत्साहित केले. श्रीमती मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महिला सक्षमीकरणाचे उत्कृष्ट काम सुरू असल्याचे नमूद करून त्यांनी सरकारला धन्यवाद दिले.
यावेळी ग्लोबल इंडियाचे आयोजक डॉ. निखिल अग्रवाल, उपाध्यक्ष अशोक कौल, सुरेश जैन उपस्थित होते. उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी उमेदच्या कामाचे सादरीकरण केले.
ग्रामीण बचतगटांच्या महिलांची हॉवर्ड विद्यापीठाला भेट
श्रीमती मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या बचतगटांच्या महिलांनी अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठाला भेट दिली. यावेळी बचतगटाची उत्पादने पाहून हॉवर्डच्या प्राध्यापकांनी त्यांचे कौतूक केले.
हॉवर्डच्या सहयोगी प्रा. सोन्या सूटर आणि प्रशिक्षण आणि धोरण विभागाच्या सहसंचालक एमिली मायर यांच्याशी चर्चा करण्यात आली. बचतगटांना जागतिक बाजारपेठ, जागतिक पातळीवरील व्यवहार, वित्तीय साक्षरता आदींबाबत प्रशिक्षण देण्यासंदर्भात मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी चर्चा केली. उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी अभियानाची माहिती दिली. यावेळी फिक्कीचे प्रतिनिधी निखिल अग्रवाल, रुबाब सूद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise