Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा सहवास लाभलेले, ज्येष्ठ बौद्धाचार्य नाथा पवार यांची विशेष मुलाखत


"आंबेडकरी चळवळीचे नवे संदर्भ"
ज्येष्ठ बौद्धाचार्य नाथा पवार यांची विशेष मुलाखत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रात्मक व कृतीविषयक चळवळींचा उद्बोधक व प्रेरणादायी इतिहास अनेक मान्यवर लेखक, अभ्यासक, संशोधक विचारवंतांनी लिहून तो प्रकाशित रूपाने समाजासमोर ठेवलेला आहे. तरीही भारतीय पातळीवरील व विशेषत: महाराष्ट्र व महाराष्ट्रातील विविध भौगोलिक, प्रादेशिक भागातील सर्वच संदर्भ प्रकाशित झालेले आहेत असे नाही. सर्वदूर विखुरलेल्या सामाजिक व सांस्कृतिक संदर्भात संशोधनात्मक पातळीवर एकत्र करून त्यांना प्रकाशात आणने हे अभ्यासक व संशोधकांच्या समोरील आव्हान आहे. माणदेशी भाग आणि ऐकूणच आंबेडकरांची चळवळ यांच्यामधील हे संबंध अत्यंत घनिष्ठ असे आहेत. आंबेडकरी चळवळीचे शिलेदार ॲड. पी.टी. मधाळे, (सांगली), डॉ.आर.डी भंडारे (विटा), ॲड. बी.सी. कांबळे (पलूस), डॉ. शंकरराव खरात (आटपाडी), राजा ढाले (वसगडे-नांद्रे), रामदास आठवले (ढालेवाडी-कवठेमंकाळ), प्रा.अरुण कांबळे (करगणी),  नामदेव सावंत, एकनाथ सावंत (कौठळी), बौद्धाचार्य सावंत (लोटेवाडी), सुखदेव खरात (आटपाडी), नाना झोडगे, आण्णा झोडगे (माडगूळे), मारुती चंदनशिवे (भुड-विटा), मेंबर चंदनशिवे लेंगरे इ. मान्यवरांमध्ये प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेबांच्या सहवासातील प्रवासी आत्मचरित्रकारआंबेडकरी तत्वज्ञान आणि मांडणी करणारे भाष्यकार चळवळीचे प्रचारक व प्रसारक म्हणून सर्व ज्ञात आहेत. तर या मधीलच काही आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात साध्या नोंदीही उपलब्ध झालेल्या नाहीत. म्हणून आंबेडकरी चळवळीच्या गतिमानतेसाठी व नव्या पिढीच्या प्रेरणासाठी या नव्या संदर्भाच्या नोंदी घेणे आवश्यक आहे म्हणून बौद्धाचार्य नाथा पवार यांची घेतलेली मुलाखत म्हणजे त्यांचाच एक अल्पसा प्रयत्न..


जय भीम सर ........जय भीम

प्रश्न : साहेब आपली जन्मतारीख, शिक्षण व जन्मस्थळ याबद्दल काही सांगू शकाल?
उत्तर:  जन्म स्थळ तालुका आटपाडी येथे. 1 मे रोजी 1925 ला झाला. सध्या पंचशील निवास आटपाडी येथे वास्तव्यास आहे. तसं माझं शिक्षण काहीच नाही.

 प्रश्न :आपल्या कौटुंबिक जीवनाबद्दल थोडंसं..
उत्तर : वयाच्या तिसाव्या वर्षी म्हणजे 1955 मध्ये प्रथम विवाह. पहिला पत्नी ला दोन मुले व तीन मुली. 1969 मध्ये पहिल्या पत्नीचे निधन झाले. 1971 मध्ये पुन्हा दुसरा विवाह तिला एक अपत्य मुलगी. सर्व अपत्याचे सातवी ते बी.ए पर्यंत शिक्षण.

प्रश्न: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भेट होण्याचा योग आपल्या जीवनात कसा आला?
 उत्तर : १९४६ च्या दरम्यान मी 22 लहान मुलांचे बटालियन्स मध्ये भारती झालो. सैन्यात भरती झालो. लष्करी सेवेत असतानाच काही कारणास्तव 1954 मध्ये मी राजीनामा दिला व मुंबईतच राहून उपजीविकेसाठी टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला. त्याच वेळी आर.डी भंडारे साहेबांचे मित्र वेताळ बेले (मिस्त्री) यांच्या सहवासात आलो आणि त्यांच्या माध्यमातून 1954 मध्ये "राजगृह" येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली. डॉ बाबासाहेबांच्या कार्याची व त्यांच्याविरुद्ध चळवळींची माहिती आम्हाला हळूहळू होत होती. मूळ मी लष्करी सेवेतील माणूस असल्याने बाबासाहेबांच्या समोर जाताच त्यांना सॅल्यूट करून मी प्रथम अभिवादन केले. नंतर डॉ. बाबासाहेबांकडून माझी आस्थेने विचारपूस झाली. व लगेच समता सैनिक दलात दाखळ झालो. मा. एम.एम. असोळेकर साहेबांनी  माझीऑफिसर या पदावरून नियुक्ती केली. त्याचवेळी मी पोर्टट्रस्ट 1381 मध्ये सुरक्षा रक्षक म्हणूनही मी सेवा सुरू केली. दुसरी भेट 1955 मध्ये बुद्धजयंती कार्यक्रमाचे आयोजन करून त्यामध्ये बाबासाहेबांना गार्ड ऑफ ऑनर मानवंदना देऊन सॅल्यूटही केला. दरम्यान आर.डी. भंडारे साहेबांचे बॉडीगार्ड म्हणून मी काम पाहिले. तिसरी भेट 1956 मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्याम हॉटेलमध्ये मुक्कामास होते त्या हॉटेलला पहारा देण्याचे काम मी केले. आणि महत्वाचे म्हणजे14 ऑक्टोबर 1956 दीक्षाभूमीवरील समारंभांचे स्टेज होते तेव्हा मी डॉ. बाबासाहेबांच्या सेवेत त्यांच्या रक्षकगार्ड  म्हणून उपस्थित होतो. आणि त्यावेळी मी दीक्षा ग्रहण केली. असे तीन वेळा बाबासाहेबांच्या प्रत्यक्ष सहवासात मी आलो. मी माझे भाग्य समजतो. कारण माझ्या एकूणच आयुष्याची ऊर्जा बाबासाहेब आहेत.

प्रश्न: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यु झाला तेव्हा आपण कोठे होतो? व ही बातमी आपणास कशी कळाली.
उत्तर :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाची  बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली. तशी तीमला ही समजली तेव्हा मी मुंबईतच होतो. परंतु समता सैनिक दलाच्या कामात व्यस्त असल्यामुळे मला तात्काळ उपस्थित राहता आले नाही. पण समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांच्या अंत्यविधीस बंदोबस्तासाठी उपस्थित होतो.

प्रश्न: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूच्या संदर्भात आंबेडकरी चळवळीमध्ये काही संशोधक, अभ्यासक व लेखक मंडळी माईसाहेब या जबाबदार असल्याचा निर्देश करतात. याबद्दल आपणास काय वाटतं?
 उत्तर : डॉ .बाबासाहेबांच्या मृत्यूच्या संदर्भात माईसाहेबांना जबाबदार धरणे ही गोष्टच मला मान्य नाही. डॉ. बाबासाहेबांच्या सोबत राहून समाजाचे जवळून नेतृत्व करणारी ही मंडळी होती. त्यांच्यामध्ये नेहेमीच बाबासाहेबांच्या जवळ जाण्यासाठी चुरस लागत होती. डॉ. बाबासाहेबांच्या नंतर हे समाजाचं नेतृत्व माईसाहेबांकडे न जाता आमच्याकडे राहावे या हेतूने जाणीवपूर्वक बाबासाहेबांच्या मृत्यूसंदर्भात माईसाहेबांना जबाबदार धरले जाते मला वाटतं.

प्रश्न: माईसाहेबांनीआपल्या आत्मचरित्रामध्ये बाबासाहेबांना राज्यघटना व अनेक ग्रंथ लिहिण्यास मी मदत केली एवढेच नव्हे तर धर्मांतराचा निर्णय ही त्यांनी माझ्या सांगण्यावरूनच घेतला. असे जे सांगितले आहे त्यामध्ये नेमकं खरं काय?
 उत्तर : प्रत्येक महापुरुषांच्या कार्यामध्ये त्यांच्या पत्नीचा वाटा महत्त्वाचा असतो हे जरी खरे असेल तरी डॉ .बाबासाहेबांच्या संदर्भात असे म्हणता येणार नाही. कारण बाबासाहेबांचा प्रत्येक निर्णय स्वत:चा असायचा. शिवाय त्यांच्या जागतिक पातळीवरील त्यांच्या विद्वतेची महती सर्वांना माहीत आहे. बाबासाहेबां बद्दल हे सांगणे मान्य, करणे म्हणजे डॉ. बाबासाहेबांच्या विद्ववतेवर आघात करण्यासारखे आहे, शिवाय माईसाहेब डॉ. बाबासाहेबांच्या सहवासात प्रत्यक्ष सात-आठ वर्ष आहेत. त्यामुळे त्याचे हे म्हणणे मला मान्य करता येत नाही.

प्रश्न : आपण डॉ बाबासाहेबांच्या सहवासात वावरत असताना आपल्या मनामध्ये काही राजकीय जाणीव निर्माण झाली का?
 उत्तर : नाही, आणि आजही नाही. मला त्यांनी सांगितल्या प्रमाणे सांस्कृतिक व सामाजिक बदल महत्त्वाचे वाटतात.

प्रश्न: आपल्या हातून झालेल्या सामाजिक कार्याबद्दल काही महत्त्वपूर्ण बाबी सांगता येतील का?
उत्तर :  मी फक्त उल्लेख करेन. 1957 ते 1962 या काळात आर.डी भंडारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सांगली जिल्ह्यात प्रचार, भूमिहीन सत्याग्रह चालू असताना तुकडीचे नेतृत्व केले. सामाजिक अन्याय अत्याचारा संदर्भात मोर्चा, धरणे इ. आंदोलनात सहभाग, मुंबईच्या सर्व धर्म समभाव संस्थेचा 19 वर्षे अध्यक्ष. बी.पी.टी. कामगार संघाचे सेक्रेटरी म्हणून शांती पटेल यांच्या सोबत काम, किंवा सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक बाबींच्या संदर्भात सांगायचे झाले तर, 14ऑक्टोबर 1956 ला प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या सभेत त्यांच्याकडून दीक्षा ग्रहण त्यांचा फोटो माझ्याकडे आहे. 1958 पासून मुकुंदराव भैय्यासाहेब व मिराताई यांच्या मार्गदर्शनानुसार आर.डी. भंडारे यांच्यासोबत बुद्धिस्ट सोसायटी अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे कार्य, 1969 पासून बौद्धाचार्य म्हणून संस्कार विधिसेवा, आंतरजातीय व धार्मिक विवाहसाठी प्रयत्न, सर्वात महत्वाचे म्हणजे 1972 मध्ये माटूंगा लेंबर कॅम्पला नामदेव बनसोडे (म्हसवड), आत्माराम कांबळे (करगणी) यांना सोबत घेऊन मी आंबेडकर उद्यानामध्ये बाबासाहेबांचा पुतळा तेथील प्रशासनाला न जुमानता बसवला. आणि विशेष म्हणजे शेड्यलकास्ट फेडरेशन, संयुक्त महाराष्ट्र समिती व आर.पी.आय पक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रचार कार्यात सहभाग घेतला.

प्रश्न: डॉ. बाबासाहेबांच्या सहवासात असताना तुमच्या जीवनातील एखादा महत्त्वपूर्ण प्रसंग सांगाल काय?
 उत्तर: 13 आक्टो. १९५६ साली बाबासाहेबांनी रात्री दहानंतर चष्मा न वापरता स्वतःच्या हाताने 22 प्रतिज्ञांचे लेखन करतानाचे व14 ऑक्टोबरला दीक्षाभूमीवर चष्मा न वापरता वाचन केलेली घटना मी पाहिलेल्या आहेत.

प्रश्न: तुमच्या जीवनातील दुःखद प्रसंग सांगा. 6 डिसेंबर 1956 डॉ बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापासून ते आतापर्यंत तुम्ही एकूणच आंबेडकरी चळवळीचे साक्षीदार आहात आंबेडकर चळवळीचे विविध स्थित्यंतरे आपण पाहिलेली आहेत. अनुभवलेले आहेत. तर वर्तमान आंबेडकर चळवळी संदर्भात आपण सांगू शकाल?
उत्तर: चळवळीची काम करणाऱ्या तिसऱ्या पिढीची दिशा पूर्णत: चुकलेली आहे. तकलादू स्वरूपाची चळवळ निर्माण करून समाजाचा विश्वासघात या पिढीने केलेला आहे. त्यामुळे समाजनिष्ठ व विचारनिष्ठ चळवळ न बनता ती भक्तिनिष्ठा बनली, त्यामुळे समाजाचा तोटा झाला.

प्रश्न:  आज पर्यंत काही सामाजिक व शासकीय पातळीवर आपणास सन्माननीत केलं गेलं का? 
उत्तर: कधीच नाही. 

प्रश्न: एकूणचआंबेडकरी समाजास आपण काय संदेश द्याल?
 उत्तर: मनुवाद्यांच्या विविध प्रलोभनापासून सावध राहा. डॉ.बाबासाहेबांच्या संविधानाचा विचार घेऊन समाजात प्रबोधन करा. सामाजिक समतेची लढाई अधिक गतिमान करून, डॉ.बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करा. आंबेडकरी चळवळ एक संघ ठेवण्याचा अधिक प्रयत्न करा.
धन्यवाद पवार साहेब.............!
आभारी आहोत.   !!! जय भीम!!!

मुलाखतकार  
प्रा.डॉ.रामदास नाईकनवरे
मो.९८९०१२३४३८



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies