Type Here to Get Search Results !

वीजअभियंत्यांच्या देवाणघेवाणीतून पिण्याच्या पाण्याचा बेसुमार उपसा- दिघंचीचे सरपंच अमोल मोरे यांचा आरोप


वीजअभियंत्यांच्या देवाणघेवाणीतून पिण्याच्या पाण्याचा बेसुमार उपसा 
निंबाळकर तलावातील प्रकार सरपंच अमोल मोरे यांचा आरोप आमरण उपोषणाचा इशारा
माणदेश न्यूज नेटवर्क 
आटपाडी/लक्ष्मणराव उर्फ एल जी खटके: दिघंची गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या निंबाळकर तलावावर वीज वितरण विभागाच्या अभियंत्यांकडून पैशाची देवाणघेवाण करून विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे गावाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे असा आरोप करीत या त्यांच्या कृत्याविरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिघांचीचे सरपंच अमोल मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
दिघंची गावची लोकसंख्या ही जवळपास २०  हजार एवढी आहे. या गावात तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत आटपाडी तालुक्यातील सर्व लोकांसह सांगोला व माळशिरस, माण तालुक्यातील लोकांचा वावर व व्यवहार असतो. तसेच या गावात अनेक लोक परगावाहून वास्तव्यास येतात. शाळा, कॉलेज व नोकरीनिमित्त येथे राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या गावात पाणीपुरवठ्याची सुविधा व्यवस्थित व सुरळीत चालणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना या भागाला कोणत्याही पाणी योजनेचा लाभ होत नाही. निंबाळकर तलाव पावसाच्या अंगभूत पाण्यावर अवलंबून आहे. या तलावांमध्ये कोणत्याही प्रकारे पाणी सोडण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे दिघंची सारख्या मोठ्या गावाची तहान भागवणारा व पाणीपुरवठा करणारा हा एकमेव स्रोत आहे. या तलावात पाणीसाठा अतिशय कमी आहे. त्यामुळे भविष्यकाळातील काही दिवसातच पाणीटंचाईची समस्या भेडसावणार आहे.
या बाबींची जाणीव ठेवून सरपंच अमोल मोरे यांनी निंबाळकर तलावाशेजारील सर्व विहिरींची वीज कनेक्शन सोडण्यासंदर्भात आटपाडीचे तहसीलदार तसेच दिघंची ग्रामपंचायत कार्यालय यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला कळवले होते. परंतु या बाबीकडे वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले आहे. या तलावाच्या परिसरातील शेतकऱ्यांकडून पैशाची देवाणघेवाण केली असल्याचा थेट आरोप सरपंच मोरे यांनी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता गुरव यांच्यावर केला आहे. वीज कनेक्शन तोडण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन तोडले. मात्र या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वीज वितरण कंपनीचे अधिकारी पैशाची देवाण-घेवाण करून वीज कनेक्शन रात्री जोडत होते व सकाळी पुन्हा कनेक्शन तोडत होते असा उपकार्यकारी अभियंत्यांनी सुरू केलेला कार्यक्रम गेले एक महिन्यापासून चालू आहे. केवळ पैशाच्या हव्यासापोटी व जाणूनबुजून दुर्लक्ष करीत उपकार्यकारी अभियंता यांनी तसाच कार्यक्रम पुढे चालू ठेवला आहे.  वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या अशा वागण्यामुळे दिघंची गावांमध्ये पाणीपुरवठा समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी सरपंच मोरे यांनी उपकार्यकारी अभियंता यांच्यावर राहणार असल्याचे म्हटले आहे.
दिनांक 8 ऑक्टोबर रोजी वीज वितरण कंपनीच्या या अधिकाऱ्याने सिंगल फेज कनेक्शन हे फक्त एका घरासाठी चालू केले होते. यासंदर्भात सरपंच मोरे यांनी अधिकाऱ्याच्या या कृतीला विरोध केला. मात्र त्यांनी जिल्ह्यातील एका मोठ्या राजकीय नेत्यांचा दबाव असल्यामुळे हा विद्युत पुरवठा सुरू केला असल्याचे उत्तर दिले. यामुळे एक सिंगल फेज कनेक्शन चालू ठेवण्यासाठी महाडिकवाडी तलावातील सुमारे अठराशे इतर सिंगल फेज विद्युत पंप रात्री पासून शेतीसाठी चालू होते. त्यामुळे या तलावातील पाणी उपसा मोठ्या प्रमाणात सुरू झाला. अधिकाऱ्याच्या या अशा वागण्यामुळे दिघंची गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे सिंगल फेज कनेक्शन आजच्या आज बंद करण्यात यावे अन्यथा दिनांक १०/१०/ 2018 पासून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यासाठी गावकऱ्यासमवेत उपोषणास बसणार असून  होणाऱ्या परिणामास जबाबदार उपकार्यकारी अभियंता यांना धरण्यात येईल असा इशारा मोरे यांनी पत्रात दिला आहे. या पत्राच्या प्रती सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालय, खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलभाऊ बाबर, आटपाडी चे तहसीलदार यांना दिल्या आहेत.


खासदार संजय काका पाटील यांचा हात
दिघंची परिसरात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे परिसरात दुष्काळाची परिस्थिती आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या निंबाळकर तलावाची पाण्याची पातळी घटली आहे. या तलावावरील शेतीसाठी असणारे सर्व विद्युत कनेक्शन बंद करावेत असे पत्र दिघंची ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला दिले होते. त्यावरून त्यांनी कारवाई करून सर्व विद्युत पंपांचे कनेक्शन बंद केले होते. परंतु अचानक दोन दिवसांपूर्वी त्यांनी येथील विद्युत पुरवठा पूर्ववत केला आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांकना विचारणा केली असता उपकार्यकारी अभियंता गुरव यांनी खासदार संजयकाका पाटील यांनी विद्युत पुरवठा सुरू ठेवा असा आदेश दिला असल्याने तो विद्युत पुरवठा मी खंडित करू शकत नाही असे सांगितले. जर हा विद्युत पुरवठा तात्काळ खंडित केला नाही तर गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागेल. सुरू असलेल्या विद्युत पुरवठा खंडित करून महावितरणचे अधिकारी गुरव यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी अशा मागणीचे पत्र सरपंच अमोल मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलभाऊ बाबर यांनाही याबाबत कळविले आहे.

 दिघंची गावची लोकसंख्या सुमारे वीस हजार आहे त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात गावाचे पाण्याची गरज भागवणे ग्रामपंचायतीला आवश्यक आहे  निंबाळकर तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो तलावात पाणी टिकून वापरल्यास सुमारे तीन महिन्यापर्यंत टिकेल एवढा पाण्याचा साठा आहे मात्र असा बेसुमार जर पाणी उपसा सुरू राहिला तर महिन्याभराच्या आत तलावातील पाणी संपुष्टात येऊन पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवेल एवढ्या मोठ्या गावाला पाणीपुरवठ्यासाठी टँकरची ताकद ही कमी पडेल किंवा अन्य कोणतीही पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करता येणार नाही पैशाचा हव्यासापोटी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विजयकुमार गुरव उद्योग करून गावकऱ्यांशी खेळ खेळताहेत. विद्युत पुरवठा खंडित हेच करतात आणि रात्री तो जोडण्याचे कामही यांच्यामार्फत होते. दिवसा मात्र बंद ठेवा असे फर्मान सोडतात. शेतकऱ्यांचे ऊस पीक असून आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो. जिल्ह्यातील एका नेत्याने त्याचे नाव घेऊन या कनेक्शनला अभय दिला जातो. मात्र गाव पातळीवर लोकांचे काय हाल होतात याची जाणीव त्यांना काय येत नाही. एखाद्या कार्यकर्त्यास जोपासण्यापेक्षा आख्या गावाचा विचार जिल्ह्यातील लोकांनी केला पाहिजे.
अमोल मोरे सरपंच ग्रामपंचायत दिघंची

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies