दि. १२ रोजी वयोवृद्धांचा डोंगरगाव येथे पेन्शन मेळावा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 9, 2018

दि. १२ रोजी वयोवृद्धांचा डोंगरगाव येथे पेन्शन मेळावा

दि. १२ रोजी वयोवृद्धांचा डोंगरगाव येथे पेन्शन मेळावा 
माणदेश न्यूज नेटवर्क
आटपाडी/प्रतिनिधी : देशातील ९ राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षावरील सर्वांना गोवा राज्याच्या धर्तीवर दरमहा २००० हजार रुपये पेन्शन राज्य शासनाने येत्या हिवाळी अधिवेशनाच्या आत चालू करावी, या मागणीसाठी सांगोला तालुका जनता दलाच्या वतीने शुक्रवार दिनांक 12 ऑक्टोबर २०१८ रोजी डोंगरगाव ता. सांगोला, जि. सोलापूर येथे भव्य वयोवृद्धांचा पेन्शन मेळावा आयोजित केल्याची माहिती, जनता दलाचे नेते आबासाहेब सागर व ज्येष्ठ नेते ललित बाबर यांनी दिली आहे. देशातील ९ राज्याप्रमाणे राज्यातील 60 वर्षावरील सर्वांना दरमहा 2 हजार रुपये पेन्शन चालू करावी, म्हणून जनता दलाने राज्यात मोठा लढा उभारलेला आहे. गेली ७ वर्षे संबंधित लढा चालू असून, मागील सरकारने पेन्शन देऊ म्हणून दिलेला शब्द पाळला नाही.  2014 च्या विधानसभेला महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी ‘सत्ता द्या पेन्शन देतो’ असे जाहीरनामे प्रकाशित केलेले होते. त्यास अनुसरून सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिनांक ८ ऑगस्ट २०१६ रोजी गोवा, तमिळनाडू, केरळ राज्याच्या धर्तीवर पेन्शन देण्याचे आश्वागसनही दिले होते. परंतु आजअखेरही त्यांनी दिलेले आश्वासन पाळलेले नाही. परंतु यापेक्षा दुर्दैव म्हणजे देशाचे प्रधानमंत्री यांनी दिनांक २३ मार्च २०१४ रोजी 60 वर्षावरील सर्वांना ५००० हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा केली. परंतु ५  वर्षाचा काळ संपत आला तरीदेखील ५ रुपये ही वयोवृद्धांच्या खात्यावर वर्ग केलेली नाही. 
दि. १८ मार्च २०१४ रोजी राज्यपाल महोदयांनी देखील राज्यातील सर्वपक्षीय आमदारांची बैठक राज्य शासनाने तातडीने बोलवून देशातील ९ राज्याप्रमाणे पेन्शन चालू करण्याची शिफारस राज्यपाल महोदयांनी राज्य सरकारला केली. परंतु त्याकडेही लक्ष देण्यास राज्यकर्त्यांना वेळ नाही. 
याउलट गरज नसताना राज्यातील 850 माजी आमदारांना पूर्वी 40 हजार मिळणारी पेन्शन, आता ५० हजार रुपये केली आहे. परंतु यांना वयोवृद्धांचे भानदेखील राहिलेले नाही. तसेच राज्यातील मयत 750 माजी आमदारांच्या कुटुंबीयांना देखील सरकारने २५ हजार रुपये पेन्शन चालू केली आहे व वयोवृद्ध लोकांना वाऱ्यावर सोडले आहे.
या सर्वांचा जाब राज्य शासनाला विचारण्यासाठी, शुक्रवार दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ रोजी सदरच्या मेळाव्याचे आयोजन केले असून, सदर मेळाव्यास 60 वर्षावरील सर्व स्त्री, पुरुष यांनी उपस्थित राहून, राज्य शासनाला वयोवृद्धांची ताकद दाखवून देण्याची वेळ आली असून, या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक ललित बाबर, आबासाहेब सागर विश्वनाथ ऐवळे, बाळासाहेब तंडे, दिगंबर आदलिंगे, यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Advertise