Type Here to Get Search Results !

दिघंचीचे युवा नेते अमोल काटकर यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर


दिघंचीचे युवा नेते अमोल काटकर 
यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
माणदेश न्यूज नेटवर्क 
आटपाडी: आटपाडी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत दिघंची येथील भाजपाचे युवा नेते अमोल काटकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल, तलाठ्यामार्फत होणाऱ्या आणेवारीवरून अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत चर्चा केली. दिघंची येथून  सकाळी 9:30 वाजता  महिलांसाठी खास एसटी बस सुरु करणेबाबतची मागणीही त्यांनी केली.
आटपाडी पंचायत समितीची आढावा बैठक खासदार संजयकाका पाटील यांनी सोमवारी घेतली. त्यामध्ये अनेक विषयावर धारदार चर्चा झाली. यामध्ये तालुक्यात कामचुकारपणा करून राजकारण करणाऱ्या अधिकाऱ्याचे पितळ उघडे पाडले. दिघंची येथील भारतीय जनता पार्टीचे दिघंची जिल्हा परिषद गटाचे युवा नेते अमोल काटकर यांनी विविध प्रश्न मांडत आढावा बैठकीत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली. शनिवार दि. २० ऑक्टो बर रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे रस्ते विकास कामाच्या उद्घाटनासाठी दिघंची येथे येणार होते. चंद्रकांतदादा पाटील हे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्र्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते असून हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे नेते येणार असल्यामुळे तसा भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली होणे आवश्यक होते. परंतु या कार्यक्रमाचे संयोजन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुभाष पाटील, कार्यकारी अभियंता काटकर यांनी केले होते. या उद्घाटनासाठी भाजपचे मंत्री येणार असल्यामुळे तालुक्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांना निमंत्रण देणे या खात्यामार्फत क्रमप्राप्त असताना अधिकाऱ्यांनी हा प्रकार जाणीवपूर्वक टाळला असावा असा कयास आहे. तसेच दिघंची येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही याबाबत निरोप दिला नाही. त्यामुळे या कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलवरून आढावा बैठकीत अभियंता सुभाष पाटील यांना उपस्थितांनी खडे बोल सुनावले. युवा नेते अमोल काटकर यांनी या घटने बाबत नाराजी व्यक्त करीत या कार्यक्रमाला प्रोटॉकल न पाळता सर्वांना या कार्यक्रमापासून अभियंता सुभाष पाटील यांनी जाणीवपूर्वक दूर ठेवला असल्याचा आरोप केला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फक्त चंद्रकांतदादांच्या प्रेमापोटी उपस्थिती दर्शवून स्वागताचा कार्यक्रम पार पाडला. मात्र तालुक्यातील भाजपचे जेष्ठ नेते बंडोपंतदादा देशमुख वगळता भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तालुक्यात भाजपची एकमुखी सत्ता असतानाही केवळ दिघंची येथे ‘शिवसेनेचे राज्य’ आहे म्हणून हा प्रकार घडला तर नसावा ना? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आटपाडी तालुका हा सर्वाधिक दुष्काळाचा तालुका असतानाही व त्याची दाहकता येथे सर्वाधिक असताना महसूल विभागाच्या क्रूर धोरणामुळे तालुक्यात चुकीची आणेवारी लावण्यात येते. ही आणेवारी लावत असताना त्यासाठी आवश्यक असणारे निकष न पाहता तलाठी कार्यालयात बसून आणेवारी लावतात. ती आणेवारी संपूर्णपणे चुकीचे असते. प्रत्यक्षपणे लावलेली आणेवारी आणि वस्तुस्थिती यामध्ये खूप तफावत असते. याचा परिणाम म्हणून आटपाडी तालुक्याला 50 पैशापेक्षा कमी आणेवारी असतानाही महसूल विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळत नाहीत. दुष्काळी व टंचाई परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तालुक्याला याच्या झळा भोगाव्या लागत असल्या तरी चुकीच्या आणेवारीमुळे शालेय विद्यार्थ्यांनाही फी सवलतीचा लाभ मिळत नाही. तसेच तालुक्याला दुष्काळी व टंचाईच्या अन्य सवलती मिळत नाहीत. याबाबतही अमोल काटकर यांनी या आढावा बैठकीत आवाज उठवला.
दिघंची हे गाव आटपाडी तालुक्यातील आटपाडीनंतरचे  दुसऱ्या क्रमांकाचे गाव आहे. या ठिकाणाहून अनेक मुले व मुली तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षणासाठी येतात. त्यामुळे सकाळी त्यांची दिघंची बसस्थानकावर गर्दी असते. तसेच तालुक्याच्या ठिकाणी या परिसरातून व दिघंची गावातून येणार्याी महिलांचे प्रमाणही सर्वाधिक आहे. याबरोबरच या गावाच्या सभोवताली अन्य  गावे व वाड्या-वस्त्या असल्यामुळे तेथूनही लोक एसटी बसच्या प्रवासासाठी दिघंची येथे येतात. असे असतानाच मुलींची व महिलांची प्रवासाची गैरसोय होते. या वेळेत वाहनांची संख्या तुरळक आहे. त्यामुळे दिघंची येथून सकाळी 9:30 वाजता फक्त मुली व महिलांसाठी विशेष बस सोडण्यात यावी, अशी मागणी अमोल काटकर यांनी या आढावा बैठकीच्या माध्यमातून एसटी महामंडळाला केली आहे.
युवा नेते अमोल काटकर हे भाजपचे दिघंची येथील प्रमुख कार्यकर्ते असून खासदार संजयकाका पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची प्रशासनाला पूर्तता करणे भाग पडणार आहे. संपूर्ण दिघंची जिल्हा परिषद गटात त्यांच्या या मागणीमुळे महिला व मुलींची गैरसोय थांबणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies