Type Here to Get Search Results !

पडळकरांच्या लढाईस खा.उदयनराजेंचे पाठबळ; साताऱ्यात बैठक, आरक्षणावर तासभर सकारात्मक चर्चा


पडळकरांच्या लढाईस खा.उदयनराजेंचे पाठबळ 
साताऱ्यात बैठक, आरक्षणावर तासभर सकारात्मक चर्चा 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/ लक्ष्मणराव ऊर्फ एल.जी.खटके : महाराष्ट्रातील धनगर समाजाचे नेते व भाजपाचे गतकाळातील स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्यात धनगर समाजाच्या आरक्षण, मराठा, मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर सातारा येथे सकारात्मक चर्चा झाली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर उभा केलेल्या अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा या लढाईत जाहीर पाठिंबा दर्शविला.
महाराष्ट्राचे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे सातारा जिल्हा दौर्‍यावर होते. त्यावेळी सातारा येथे त्यांचे धनगर समाजाच्या वतीने अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर गोपीचंद पडळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. सर्वसाधारणपणे या भेटीदरम्यान त्यांच्यामध्ये तासभर चर्चा चालली .गोपीचंद पडळकर यांनी खासदार छत्रपती उदयनराजे यांच्याकडे धनगर समाजाच्या आरक्षणाची बाजू मांडली. पडळकर व छत्रपती उदयनराजे यांच्या मध्ये धनगर, मराठा, मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाली. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी धनगर समाजाचा आरक्षणासाठी गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर उभारलेला व पुकारलेल्या अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा या लढ्यास जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
धनगर जमात ही दऱ्या-खोर्‍यात, शेळ्या-मेंढ्या मागे राहून उपजीविका करणारी जमात आहे. या जमातीचे वास्तव्य आज इथे तर उद्या तिथे असते. मेंढीपालन हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असताना त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये संविधानाने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा आरक्षणाचा अधिकार दिला आहे. परंतु राज्य शासनाने धनगर समाजाला भटक्या जमाती मध्ये वर्गीकृत करून राज्यघटनेने व संविधानाने दिलेला अधिकार डावलला आहे. यासाठी धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून तसे दाखले देण्यासंदर्भात संपूर्ण राज्यभर गोपीचंद पडळकर यांनी लढाई सुरू केली आहे. त्यांच्यासोबत समाजाचे नेते उत्तमराव जानकर ही कार्यरत आहेत.
भारतीय जनता पार्टी सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये आमचे सरकार आल्यास पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ असे घोषित केले हो.ते या जाहीरनाम्यामध्ये आश्वासनाप्रमाणे महाराष्ट्रातील धनगर समाजाने कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार पायदळी तुडवून भाजपला डोक्यावर घेतले व सत्तेची हवा चाखू दिली. सत्तेत आल्यापासून भारतीय जनता पार्टीने आज अखेर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण कायदेशीर मार्गाने देऊन दाखले देण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. याऐवजी टीस  या संस्थेची नेमणूक केली. या संस्थेने धनगड व धनगर या शब्दांचा पद्धतशीरपणे घोळ करून धनगर समाजाला अनुसूचित जमाती चे आरक्षण मिळण्यापासून वंचित ठेवण्याचा डाव पुरा केला. सरकार आता या संस्थेची गरज नसतानाही ही संस्था नेमली. सनदशीर मार्गाने भारतीय जनता पार्टीचे सरकार समाजाला अनुसूचित जमाती चे आरक्षण देत नाही यासाठी गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पार्टीचा त्याग करून आरक्षणाची लढाई आक्रमक केली. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली. औरंगाबाद येथे महा मेळावा आयोजित करून अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा ह्या लढाईचे शक्तिप्रदर्शन केले. संपूर्ण राज्यभर या मेळाव्याची दहशत बसली. त्यानंतर त्यांनी आरेवाडी येथील दसरा मेळाव्यात याच पद्धतीने शक्तिप्रदर्शन करून धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाआरती, महायज्ञ व एक लाख पणत्यांचे दीपप्रज्वलन करण्याचा भारदस्त कार्यक्रम घेतला. त्यामधूनही सरकारला धडकी भरली. हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी पडळकर बंधू व उत्तमराव जानकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर धनगर आरक्षणाबाबत जनजागृती सुरू केली आहे. राजकारण बाजूला ठेवून केवळ आरक्षणासाठीच आता संपूर्ण वेळ खर्च कर करू लागले आहेत. सातारा येथे याबाबत झालेल्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना धनगर आरक्षणाबाबतची भूमिका मांडली. त्यानंतर छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन मराठा. धनगर. मुस्लिम आधी समाजाच्या आरक्षणावर सुमारे तासभर चर्चा केली. याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दर्शवून आरक्षणाच्या लढाईत पाठबळ दिले. गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणाबाबत समविचारी असणाऱ्या लोकांचा पाठिंबा घेण्याची भूमिका सुरू केली असून जे समाजाच्या आरक्षणास पाठिंबा देतील त्यांचा पाठिंबा घेऊन पुढील वाटचाल करण्याचे धोरण आखले आहे. आरक्षणाच्या बाबतीत लोकशाही मार्गाने लढा उभा करून आरक्षण मिळेपर्यंत हा लढा न थांबण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले मिळेपर्यंत व सर्व लाभ मिळेपर्यंत ही लढाई चालूच राहणार आहे.

धनगर आरक्षणाला माझा पाठिंबा आहे. माझी मागणी आर्थिक निकषावर होती. परंतु सरकार आर्थिक निकषावर आरक्षण देत नाही. धनगर समाजाची संख्या आहे त्या संख्येवर आधारित त्यांना आरक्षण द्यावे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय महत्त्वाचा आहे. तितकाच महत्त्वाचा विषय धनगर समाजाच्या आरक्षणाचा आहे. धनगर समाजाची मागणी न्याय आहे असे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले व धनगर आरक्षणाचा लढ्यास त्यांनी पाठिंबा दर्शवला. आरक्षणाच्या बाबतीत आम्ही लोकशाही मार्गाने लढा उभा केला आहे. आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही. ही लढाई चालूच राहणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचा समाजाला पाठिंबा आहे. आम्ही समविचारी लोकांचा पाठिंबा घेणार आहे. जो समाजाला पाठिंबा देईल त्याचा पाठिंबा मी घेणार आहेत. इतरांचा विचार करणार नाही.गोपीचंद पडळकरधनगर समाज नेते महाराष्ट्र राज्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies