राज्यशासनाचा दूटप्पीपणा….!!! - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 23, 2018

राज्यशासनाचा दूटप्पीपणा….!!!

राज्यशासनाचा दूटप्पीपणा….!!!
माणदेश न्यूज नेटवर्क : राज्यातील निम्म्या विभागास पाणीटंचाई व दूष्काळाच्या प्रचंड झळा बसू लागल्या आहेत, मराठवाडा तर कोरडा ठण पडला आहे. सांगली जिल्ह्यातील पूर्व भागातही दूष्काळाचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत. यामध्ये जत, कवठेमहंकाळ, आटपाडी ,खानापूर तर काही प्रमाणात मिरज ,तासगावच्या काही गावांचा यात समावेश होतो. हे उघड आहे. जरी प्रत्यक्ष क्षेत्रभेट दिली तर यातील बऱ्याच गोष्टींचा उलघडा होऊ शकतो. हे सर्व असतानाही राज्यशासनाच्या मदत व पूर्नवसन विभागाने जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांना पत्र पाठवून दूष्काळाची तीव्रता तपासण्याचे आदेश काढले आहेत. त्या पत्राबरोबर दूष्काळ जाहीर करण्याची तातडी असलेल्या तालूक्यांची नावे दिली आहेत. यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असलेल्या तालूक्यामध्ये आटपाडी, कवठेमहंकाळ या तालूक्याबरोबर कडेगाव व पलूसचा समावेश केला आहे. तर दूसरीकडे मध्यम स्वरूपाचा दूष्काळ असलेल्या तालूक्यामध्ये जत व खानापूरचा समावेश केला आहे. 
खरेतर सध्या खानापूर व जत तालूक्यास या पाणीटंचाई व दूष्काळाचा चटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. कारण खानापूर तालूक्यामध्ये रेणावी ते बाणूरगड या घाटमाथ्यावरील २४ गावात कोणतीही जलसिंचनाची सूविधा नसल्याने येथील नागरिकांचे खूप हाल होत आहेत. पिण्याचे पाणीही बहूतांशी गावात मिळत नाही. जनावरे व शेतीची पूर्ण वाट लागली आहे. लोकप्रतिनीधी व संबंधीत ग्रामपंचायतींचे पूर्ण दूर्लक्ष झाले आहे. अद्याप एकाही ग्रामपंचायत व पंचायत समितीने दुष्काळ व टंचाई जाहीर करण्याचा ठराव केलेला नाही. हे कमी की काय? म्हणून एकीकडे सांगली जिल्ह्यातील सर्व योजनांचा लाभ घेणारा कडेगाव व पलूस तालूक्याचा समावेश गंभीर स्वरूपाच्या दूष्काळाची नोंद केली आहे. 

तर पाणी-पाणी म्हणून टाहो फोडणाऱ्या जत, खानापूरला सापत्न वागणूक देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्यशासनाने केले आहे. खानापूर तालूक्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे, ऑगस्ट महिन्यापासूनच प्रत्येक गावात पाण्यासाठी मारामार चालू आहे. तरीही स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासन, महसूल अधिकारी यांनी झापडबंद कारभार करीत आहेत. यावेळी दुष्काळाची झळ मोठी आहे असे मानले जाते. कारण ऑक्टोंबर महिना संपण्याअगोदरच लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. सर्व विहीरी, तलाव, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. बाजारात जनावरे मोठ्या प्रमाणात विक्रीस येतआहे. शेतातील वीज कनेक्शन थकबाकीमुळे तोडली जात आहेत. बँकेच्या पीककर्जा वसूलीअधिकारी तगादा लावत आहेत. यावर कोणीही उपाययोजना करीत नाही. तात्पूरती मदत म्हणून शेजारच्या आटपाडी, तासगाव तालूक्यात टेंभू व आरफळ योजनेचे पाणी मोठ्या प्रमाणात आहे. तेथूनही पाणी टंचाईग्रस्त भागाला देण्यासाठी काही हालचाल केली पाहिजे. संपूर्ण जत तालूकाही पाण्याविना मरणयातना सोसत आहे. राज्यसरकार पूरेसे पाणी पूरवत नाही म्हणून मागील काही वर्षापासून येथील काही गावांनी कर्नाटकास जोडण्याची विनंती केली होती. यावर्षीही ही मागणी पून्हा होऊ शकते. याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने खानापूर व जत तालूक्यास गंभीर दूष्काळ असलेल्या तालूक्यामध्ये समावेश करावा व दूष्काळ जाहीर करून नूकसान टाळावे. अन्यथा दूष्काळाच्या झळा सोसत असलेल्या गावामध्ये मोठा संताप व उद्रेक होऊ शकतो.  प्रा. स्वप्निल इमानदार,विटा

No comments:

Post a Comment

Advertise